Monday, June 7, 2010

शरदराव, हे फार झाले

राजकारणाची नस अचूक ओळखलेले जे मोजके नेते आहेत, त्यात शरद पवारांचा समावेश आहे. आपल्या भावी पत्नीसाठी एक फोन केल्याचे निमित्त होऊन शशी थरूर यांचा राजीनामा घेण्यात आला. मात्र या पूर्वी कोची संघ, आत्ता पुणे संघ यातील पवारांच्या सहभागाबद्दल एवढे काहूर उठले तरी पवार निवांत आहेत. आपल्याला जा म्हणायची हिंमत सोनिया गांधी किंवा मनमोहनसिंग यांच्यात नाही हे त्यांनी पुरेपूर जाणले आहे. एरवी सुतावरून स्वर्ग गाठणारे कॉंग्रेसचे कायदेतज्ज्ञ प्रवक्ते अभिषेक मनु संघवी हे पवारांच्या आय.पी.एल. घोटाळ्यावर मार्मिक बोलले. त्यांनी पवारांचे समर्थन केले नाही. किंवा शंकाही व्यक्त केली नाही. यु.पी.ए.च्या एका महत्त्वपूर्ण घटक पक्षाचे ते प्रमुख आहेत. त्यामुळे कॉंग्रेसची प्रतिक्रिया नाही, असे संघवी म्हणाले.
यु.पी.ए.ला काठावरचे बहुमत आहे. पवारांना अर्धचंद्र दिला तर सरकारला धोका निर्माण होतो. पवार दोषी की निर्दोष हा दुय्यम प्रश्न, पण त्यांचा पाठिंबा कॉंग्रेसने महत्त्वाचा मानला. पवारच कशाला, टू जी स्प्रेक्ट्रमध्ये कोट्यवधी रु.चा घोटाळा करणारा दूरसंचारमंत्री ए. राजा किंवा संसदेत एकदाही न येणारा रसायनमंत्री अझीगेरी यांनाही पवारांप्रमाणे संरक्षण आहे. कारण त्यांच्या द्रमुकचा पाठिंबा राष्ट्रवादीपेक्षा अधिक महत्त्वाचा आहे. 17 हजार कोटी रु.च्या घोटाळ्यानंतरही ए. राजा याला धक्का लागत नसेल, तर सोनिया गांधी पवारांना कसा धक्का देतील?
वारंवार खोटे पडल्यानंतर पवार आपणहून राजीनामा देण्याची शक्यता एक टक्काही नाही. सत्ता नसेल तर आपल्याकडे चार-पाच आमदार राहात नाहीत याचा अनुभव पवारांनी 80 ते 86 या 6 वर्षांत चांगला घेतला आहे. 1985 च्या लोकसभा निवडणुकीत साहेबराव डोणगावकर (संभाजीनगर) हा पवारांचा एकच साथीदार निवडून आला. 80 व 85 च्या निवडणुकीनंतर पवारांजवळ दोन आकडी आमदारही नव्हते. कारण खुद्द पवारांकडे सत्ता नव्हती. राजीव गांधींपुढे नाकदुऱ्या काढल्या. त्यांनी कृपा केली म्हणून पवार पुन्हा कॉंग्रेसवासी झाले. अंगाला राख फासून मी हिमालयात जाईन, पण कॉंग्रेसमध्ये जाणार नाही असे 1980 साली म्हणणारे पवार पाण्याबाहेर काढलेली मासोळी तडफडते तसे सत्तेवाचून तडफडत होते. इंदिरा गांधींनी शेवटपर्यंत त्यांना दारातही उभे केले नाही. नवख्या राजीव गांधींनी त्यांना पावन केले. अल्पसंख्याकांचा कळवळा घेऊन पवार आज कॉंग्रेसवर शरसंधान करत असले तरी त्यांना राजकीय बाळसे कॉंग्रेस प्रवेशानंतरच आले. आज ते कॉंग्रेसमध्ये नाहीत, पण सत्तेवर आहेत. कॉंग्रेस पक्ष पूर्वीसारखा बळकट नाही. त्यामुळेच कॉंग्रेसला वाकुल्या दाखवत सत्तेची फळे चाखण्यात पवार यशस्वी झाले. राजकारणातील या बदलत्या वाऱ्याची चाहूल घेण्याचे कसब त्यांच्याकडे आहे. म्हणूनच त्यांना चतुर म्हणायचे.
पण चतुर म्हणजे आदरणीय मानायचे झाले, तर लालूप्रसाद, राबडी हे पण आदरणीय ठरतील. नामी गुंड मुख्तार अन्सारी हा पण लोकसभेवर सहज निवडून येतो. निवडणूक सहज जिंकणे हा आदराचा विषय ठरत नाही. पवार कृषिमंत्री आहेत. हजारावर शेतकऱ्यांनी आत्महत्त्या केल्या. पवार क्रिकेटमध्ये रममाण. युती काळात सहकार कायद्यात छोटी दुरुस्ती केली, तर हे सरकार शेतकऱ्यांच्या मुळावर उठले म्हणत पवारांनी आकांड तांडव केले. त्यांच्या राज्यात शेतकरी विष खाऊन मरू लागला. पवारांनी डोळ्यातून टिपूस काढले नाही. क्रिकेटमध्ये ते एवढा रस घेतात तो खेेळ म्हणून नाही, तर त्यातील पैशासाठी.
सध्या आय.पी.एल.च्या पुणे संघातील त्यांच्या सहभागाबद्दल वादळ उठले आहे. आमचा कसलाच संबध नाही असे प्रथम पवार व त्यांची कन्या म्हणाली. मग 16 टक्के सहभाग उघड झाला. एवढा संबंध उघड झाल्यावर अनिरुद्ध देशपांडे यांची वैयक्तिक बोली असा खुलासा झाला. देशपांडे यांनीही लगेच टी.व्ही.वर पवारसाहेबांचा संबंध नाही, असा खुलासा केला. त्यासाठी 17 मार्चचा ठराव दाखवण्यात आला. संस्था बोलीत भाग घेणार नाही. वैयक्तिक पातळीवर कोणाला भाग घ्यायचा असेल तर चालेल असे हा ठराव म्हणतो. त्यावर पुन्हा प्रसिद्धी माध्यमांनी 31 जानेवारीचा सिटी कार्पोरेशनचा ठराव बाहेर काढला, त्यात बोलीत भाग घ्यायचा निर्णय झाला होता. याचा अर्थ दोन परस्परविरोधी ठराव करून ठेवायचे, जो उपयोगी पडेल तो पत्रकारांना दाखवायचा.
बारामतीजवळ पूर्वी एक प्रख्यात ज्योतिषी होते. गरोदर महिलेला ते मुलगा की मुलगी हे अचूक सांगायचे, अशी त्यांची ख्याती. गरोदर भगिनी आली की, हात पाहून पत्रिका पाहून ते मुलगा सांगायचे. घरातील वहीत तिच्या नावापुढे मुलगी लिहायचे. मुलगाच झाला तर शास्त्रीबोवांची कीर्ती वाढायची. मुलगी झाली म्हणून ते लोक भांडायला आले तर वही काढून ते मी मुलगीच होणार हे लेखी भाकीत दाखवत. या शास्त्रीबोवांचा गुण शरद पवारांनी उचलला. 31 जानेवारीचा एक ठराव, तर 17 मार्चचा त्याविरुद्ध ठराव. चित भी मेरी पट भी मेरी, असा मामला.
अनिरुद्ध देशपांडे या इसमाने स्वत:च्या शिरावर सर्व जबाबदारी घेऊन पवारांना वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न केला. आता शशांक मनोहर, उपटले. देशपांडे यांची बोली वैयक्तिक नव्हती, ती सिटी कार्पोरेशनचीच होती, असे मनोहर म्हणतात. आता देशपांडे गप्प.
शरद पवार यांच्याकडून एवढ्या खोटेपणाची अपेक्षा नव्हती. या पूर्वी त्यांनी अनेकदा खोटेपणाने वागल्याची अनेक उदाहरणे आहेत, पण आता मात्र हद्द झाली. कृषिमंत्री म्हणून धान्योत्पादन वाढीचे प्रयत्न म्हणावेत तर त्यांच्या खात्यावर पंतप्रधानच नाराज आहेत. क्रीडाप्रेमी म्हणावे, तर मातीतील कुस्ती, खो खो यांना वैभव प्राप्त करून दिले नाही. क्रिकेटमध्ये पैसा म्हणून तेथेच रमले. त्यालाही हरकत नाही. क्रिकेट हा सभ्य माणसांचा खेळ आहे, या समजाला शरद पवार यांनी हरताळ फासला. भाजपा आणि मार्क्सवादी या परस्परविरोधी मताच्या पक्षांनी पवारांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. खूप वर्षे सत्ता भोगलीत. मुंबईत आणि दिल्लीत वारस नेमूनही झालेत. टी.टी. कृष्णम्माचारी, व्ही.के. कृष्णमेनन यांच्याप्रमाणे बदनाम होऊन सत्ता सोडायची की, स्वाभिमानाने सत्ता सोडून शेती करायची, याचा निर्णय शरद पवारांनीच घ्यायचा आहे.
अरुण रामतीर्थकर

No comments:

Post a Comment