Wednesday, June 16, 2010

नितीशकुमारांचा त्रागा

ताकाला जाऊन भांडे लपवायचे नसते. लपवलेले भांडे कोणाला दिसले म्हणून त्रागा करायचा नसतो. बिहारचे मुख्यमंत्री आणि जनता दल (संयुक्त)नेते नितीशकुमार यांचा त्रागा अशाच स्वरूपाचा आहे. पाटण्यात भाजपा कार्यकारिणीची बैठक झाली. त्या निमित्ताने भाजपाचे सर्व मुख्यमंत्री आले. त्यात नरेंद्र मोदीही होेते. नितीशकुमार व मोदी एकत्र हात उंचावत असल्याच्या छायाचित्रासह पानभर जाहिरात अनेक दैनिकांत आली. त्यामुळे नितीश यांचे डोके फिरले. जाहिरातीबद्दल राग येण्याचे मुळात कारण नाही. कारण भाजपाबरोबर ते बिहारची सत्ता उपभोगत आहेत. त्यातून राग आला तर भाजपाचे सर्व वरिष्ठ नेते पाटण्यात होते. त्यांच्याजवळ नाराजी व्यक्त करायची. ते न करता पत्रकारांसमोर अनैतिक, असंस्कृत असे शब्द उच्चारले. एवढेच नव्हे तर भाजपाबरोबर युती असल्याचे विसरून एकदम कायदेशीर कारवाईची भाषाही बोलले. आता अक्षयकुमारची छबी त्याला न विचारता एखाद्या साबणाच्या कंपनीने व्यवसाय वृद्धी या व्यापारी हेतूसाठी वापरली तर कायदेशीर कारवाई होऊ शकते. येथे त्याचा काय संबंध? त्यांची परवानगी घेऊन फोटो छापायला हवा होता हे खरे, पण दुसऱ्या मुख्यमंत्र्याबरोबर छापला तर नितीशकुमार यांच्या अंगाला इंगळ्या डसण्याचे कारण नाही. नितीशकुमार एवढ्यावरच थांबले नाहीत, तर भाजपा नेत्यांसाठी रात्री ठेवलेली मेजवानी रद्द केली. तसेच कोसी नदीच्या पूरग्रस्तांसाठी गुजरात सरकारने दिलेली मदतही त्यांनी नाकारली. एकाच वेळी भाजपाबरोबर युती आणि त्याचवेळी भाजपाच्या एका मुख्यमंत्र्याचा दुस्वास हे अजब राजकारण आहे. नरेंद्र मोदी यांचा एवढा राग असेल तर भाजपाबरोबरची युती मोडून दाखवा, असे आव्हान लालुप्रासद यांनी नितीशकुमार यांना दिले आहे. आणखी काही महिन्यांनी बिहार विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत, त्यात मुस्लिमांची मते दुरावली जाऊ नयेत म्हणून नितीशकुमार असे उफराटे वागत आहेत. व्होट बॅंक समोर ठेवून राजकारण करणारा कॉंग्रेस पक्ष आणि नितीशकुमार यांच्यात फरक तो काय राहील? गुजरातच्या जनतेने एकदा नव्हे दोनदा मोदी यांच्या नेतृत्वावर विश्र्वास व्यक्त केला आहे. उद्योगपतींचा ओढा गुजरातमध्ये गुंतवणूक करण्याकडे आहे. शेती व औद्योगिक क्षेत्रात गुजरातने लक्षणीय प्रगती केली आहे. नरेंद्र मोदी यांना कुशल प्रशासक म्हणून आता देश ओळखतो. ज्यांच्या डोक्यात सतत जातीयवादाचे किडे वळवळत असतात, त्यांनाच मोदी सलतात. इतके दिवस ते कॉंग्रेसवाले होते, आता त्यांच्या पंक्तीत नितीशकुमार जाऊन बसले आहेत. मोदीद्वेषामुळे काही जणांना नितीशकुमार तत्त्वनिष्ठ वगैरे वाटतील. तसे नाही. 2002 साली दंगल झाली तेव्हा नितीशकुमार वाजपेयी मंत्रिमंडळात रेल्वेमंत्री होते. भाजपाने मोदींना धक्काही लावला नाही. नितीशकुमारनी त्याचवेळी मंत्रिपद सोडायला हवे होते. या उप्पर विधानसभेची निवडणूक भाजपासोबत लढवली व भाजपाला उपमुख्यमंत्री पद दिले. महिला आरक्षण विधेयकाला विरोध करताना जनता दलाचे अध्यक्ष शरद यादव यांनी लालुप्रसाद यांच्याबरोबर हात उंचावून छबी दिली. विषय कोणताही असला तरी लालुप्रसाद यांना मिठी मारणे शरद यादवांना शोभले का? लालुप्रसाद- शरद यादव यांचे एकत्र फोटो तत्त्वात बसत असतील तर नितीश-मोदी फोटो अनैतिक कसा ठरतो ? खरे तर बिहारचे हजारो मजूर महाराष्ट्र गुजरातेत पोटासाठी गेले आहेत. त्या राज्यांवर तो भार आहे. त्याबद्दल आवाज उठवणारे राज ठाकरे यांना नितीशकुमार दूषणे देणार. मग या मजुरांना विशेषत: गुजरातमधील मजुरांना ते माघारी का बोलवत नाहीत? नितीशकुमारनी एक लक्षात ठेवावे भाजपामध्ये पक्षाध्यक्ष असो वा निम्न स्तरावरील कार्यकर्ता सर्व एकमुखी बोलतात. नरेंद्र मोदी यांचे भाजपामधील स्थान प्रत्येकाला मान्य आहे. भाजपामधून मोदी यांना अलग ठरवण्याचा नितीशकुमार यांचा प्रयत्न त्यानाच हास्यास्पद ठरवत आहे. नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपा चालत असेल, तर त्यांनी भाजपाबरोबरची युती कायम ठेवावी अन्यथा शेजारच्या झारखंडमधील शिबू सोरेनचा रस्ता त्यांना मोकळा आहे.

No comments:

Post a Comment