सध्या निवडणुकीचा हंगाम आहे। कोणी कोणाला पाठिंबा द्यावा याविषयी काही नैतिक संकेत आहेत, पण तसा कायदा वगैरे नाही। काल शिव्या घातल्या त्याच्या गळ्यात आज पडणे आणि आज ज्याच्या गळ्यात पडलो त्याला उद्या शिव्या देणे हा प्रकार हल्ली सर्रास बघायला मिळतो. तरीही काही गोष्टी खटकतात. ज्यांच्यावर अन्याय झाला, त्यांच्या मुलांनी तरी त्याची जाण ठेवून वागायला हवे. तशी ठेवली नाही तर अशा लोकांना सामाजिक-दृष्ट्या कृतघ्न म्हणावे लागेल.
अशा लोकांत पहिल्या आहेत अक्कलकोटच्या डॉ. सुवर्णा मलगोंडा. त्या उच्चविद्याविभूषित आहेत शिवाय माजी नगराध्यक्ष आहेत. राजकारणात सक्रिय राहण्यासाठी इतर जीवजंतूंना जशी धडपड करावी लागते, तशी गरज डॉ. सुवर्णा यांना अजिबात नाही. या डॉ. सुवर्णा म्हणजे अक्कलकोटच्या माजी आमदार कै. पार्वतीबाई मलगोंडा यांच्या कन्या. पार्वतीबाईंनी 80 साली मंत्री झाल्यावर साखर कारखान्याचा एक प्रस्ताव मंजूर करून आणला. वास्तविक 83-84 पर्यंत कारखाना कार्यान्वित व्हायला हवा होता, पण दिल्लीतून नियोजन मंडळाची परवानगी मिळत नव्हती. पार्वतीबाई प्रयत्न करून थकल्या. लोकांचे भागभांडवल घेतले होते. त्यांचे शिव्याशाप सुरू होते. पार्वतीबाई कॉंग्रेसच्या. राज्यात आणि केंद्रात कॉंग्रेसचीच सत्ता. विकास करण्याच्या गप्पा मारणारे विकास कामात अडथळे आणत होते.
1989 साली दिल्लीतील कॉंग्रेसची सत्ता संपली. विश्वनाथ प्रतापसिंह पंतप्रधान झाले आणि रामकृष्ण हेगडे नियोजन मंडळाचे उपाध्यक्ष झाले. पार्वतीबाई एक दिवस बंगलोरला आपल्या जावयाकडे गेल्या. त्यावेळी, शेजारचा बंगला हेगडे यांचा असल्याचे कळले. साखर कारखाना मार्गी लावण्याचे अधिकार हेगडे यांच्याकडेच होते. त्यांनी चौकशी केली असता हेगडे घरीच होते. त्यांनी भेटायलाही लगेच बोलावले. शेजारी-शेजारी अशा नात्याने चर्चा झाली. हेगडे यांनी सगळ्या नोंदी टिपून घेतल्या. पुढील आठवड्यात दिल्लीस येण्यास सांगितले. कारखान्याचे नाव इंदिरा असे होते. दिल्लीत इंदिरा विरोधकांचे राज्य होते. केवळ नावामुळे प्रस्ताव अडणार असेल तर कारखान्याचे नाव बदलण्याची तयारी पार्वतीबाईंनी दर्शवली. हेगडेंनीच तशी आवश्यकता नसल्याचे सांगितले. हेगडे दिल्लीला गेले. त्यांनी इंदिरा साखर कारखान्याची फाईल शोधायला लावली.
ही एवढी वर्षे अनिर्णित का असे विचारता नियोजन मंडळातील अधिकारी म्हणाला, सोलापूर जिल्ह्यातील ××× हे मंत्री निर्णय लांबणीवर टाकण्यासाठी दडपण आणत होते. फाईल वर आली तर तळाला ढकलली जात होती. पार्वतीबाई ठरल्या तारखेस दिल्लीला गेल्या. मान्यतेचे पत्र मिळाले. कारखाना सुरू होणार अशी अवस्था येताच महाराष्ट्र सरकारने कारणाविना संचालक मंडळ विसर्जित करून कॉंग्रेस आमदार महादेव काशिराया पाटील यांच्या ताब्यात दिला. पार्वतीबाईंना किती मनस्ताप झाला असेल. या सर्व गोष्टीला सिद्रामप्पा पाटील साक्ष आहेत. आपल्या आईचा एवढा अपमान, त्रास झाला असताना डॉ. सुवर्णा या आज कॉंग्रेस उमेदवाराला लाखाचे मताधिक्य मिळवून देऊ, अशी गर्जना करतात तेव्हा आश्चर्य वाटते. जन्मदात्या आईस क्लेष देणाऱ्यांचीच सेवा करून डॉ. सुवर्णा यांना कोणते लाभाचे पद हवे?
दुसरे चिरंजीव आहेत पंढरपूरचे कल्याणराव काळे. त्यांचा आणि भालके गटाचा कलगीतुरा साखर कारखान्यांच्या निवडणुकीच्यावेळी सर्वांनी वाचला. ज्या साखर कारखान्याच्या जीवावर कल्याणराव आज पंढरपूरचे राजकारण करीत आहेत, त्या कारखान्याचे जन्मपुराण कल्याणरावांना माहीत असेलच. या चंद्रभागा कारखान्याचे मूळ प्रवर्तक म्हणजे त्यांचे वडील कै. वसंतराव काळे. पार्वतीबाईंच्या नशिबी आले तेच भोग वसंतरावांच्या वाट्याला आले. तुमचा कारखाना होतोच कसा ते बघू, असे आव्हान जवळपासच्या कॉंग्रेस पुढाऱ्यांनी दिले. कॉंग्रेसच्या विकासाच्या गप्पा कशा खोटारड्या आणि आपमतलबी असतात त्याचे हे दुसरे उदाहरण. 1995 पर्यंत हा कारखाना चालू होण्याचे कसलेच लक्षण नव्हते. दरम्यान महाराष्ट्रात सत्तांतर झाले. ज्यांना सहकारातील कळत नाही, कांदे झाडावर लागतात की वेलीवर हे माहिती नसलेले लोक सत्तेवर आले. (इति शरद पवार) शरद पवार ज्यांना बिनडोक समजत त्या सरकारचे प्रमुख मनोहर जोशी यांना वसंतरावांच्यावर झालेला अन्याय कळला. वसंतरावांच्या मार्गात काटे पेरणारे आता सत्तेच्या वर्तुळाबाहेर फेकले गेले होते. मनोहर जोशींनी सूत्रे हलवली व कारखाना मार्गी लावला. गळीत हंगामास मनोहर जाेशी उपस्थित होते. सेना-भाजपा युतीने लक्ष घातले नसते तर काळेंचा चंद्रभागा कारखाना निर्माणच झाला नसता. वसंतराव निवर्तले. कल्याणरावांकडे सूत्रे आली. ज्या लोकांनी कारखान्याचे स्वप्न साकारायला मदत केली त्यांचे डिपॉझिट जप्त करण्याची भाषा कल्याणरावांच्या तोंडात येतेच कशी? कारखान्याची माती करायला निघालेले लोक आज कल्याणरावांना शेतकऱ्यांचे तारणहार, विकासाची दृष्टी असलेला जाणता राजा भासतात ! कल्याणराव, कोठे तरी गडबड होत आहे. चंद्रभागाच्या पहिल्या गळीत हंगामात अडथळे कोणी आणले आणि मदत कोणी केली हे तुम्हीच तुमच्या तोंडाने सांगा.
तिसऱ्या आहेत करमाळ्याच्या रश्मी बागल-कोलते. मध्यंतरी एक एस.एम.एस. माझ्या वाचनात आला. थहरीं ळी ींहश ीळाळश्ररीळींू लशींुशशप डळपलशीश झेश्रळींळलळरप रपव ऊळपरीेी (प्रामाणिक राजकारणी आणि डायनासोर यात साम्य काय) प्रश्न विचित्र होता. उत्तर दिले होते "दोघेही अस्तित्वात नाहीत.' रश्मी बागल-कोलते यांच्यामुळे मला या एसएमएसची आठवण झाली. साधारण तीन वर्षांपूर्वी त्यांचे तोंड भरून कौतुक केले, याचा पश्चाताप झाला. अशीच स्वाभीमानाने वाटचाल कर, हा आशीर्वाद फुकट गेल्याचे वाईट वाटले. अकलूजचे पायच धरायचे होते तर तीन वर्षांपूर्वी अकलूजला जागा वाटपाची चर्चा मोडायची गरजच नव्हती. लोकांनी एकापाठोपाठ दोन साखर कारखाने आणि नगरपालिकेत एकदम 7-8 जागा तुम्हाला दिल्या, त्यांच्या मताला काहीच किंमत नाही? स्वर्गीय दिगंबर बागल यांना प्रथम आमदार करून त्यांच्या कार्याची पावती कोणी दिली ? करमाळ्याची सत्तासूत्रे तुमच्याकडून हिसकावून घेण्याचा प्रयत्न कोणी केला? करमाळ्याची कृतघ्नता ताजी आहे त्यामुळे त्यावर अधिक भाष्य करण्याची गरज नाही.
अकबर बिरबलाच्या गोष्टीत माकडीण पिल्लाला पायाखाली घेते असे आहे. त्याला 400 वर्षे झाली. आता पिल्ले माता-पित्यांना पायाखाली घेत आहेत. स्वत:चा मानमरातब टिकवण्यासाठी जन्मदात्यांच्या मृत्यूचाही धंदा व्हायला लागला आहे. तो देशद्रोही संजय दत्त म्हणतो की, माझ्या वडिलांच्या मृत्यूला कॉंग्रेस पक्ष कारण आहे. त्याचवेळी त्याची सख्खी बहीण कॉंग्रेसची उमेदवार आहे. संजय म्हणतो तर प्रिया कृतघ्न आहे. प्रिया बरोबर असेल तर महामूर्ख संजय बापाच्या मृत्यूचे भांडवल करीत आहे. सुनील दत्त मोठे, नर्गीस दत्तही मोठ्या. त्यांचे वारस असे कसे असाच प्रश्न पार्वतीबाई, वसंतराव, दिगंबरराव यांच्या वारसांबाबत मला पडला आहे.
5 एप्रिल 2009, आसमंत