Monday, March 16, 2009

स्वत:लाच कुत्रे म्हणवून घेणारी औलाद

मला आश्चर्य वाटते ते सेन्सॉर बोर्डाचे। भारत म्हणजे झोपडपट्ट्या, उघड्यावर शौचाला बसणारे लोक, वेश्या व्यवसाय, जातीय दंगलीत मुस्लिमांची ससेहोलपट असे भारताचे विकृत चित्र दाखवणाऱ्या चित्रपटाला सेन्सॉरने परवानगीच कशी दिली?प्रसिद्ध देवालयात गेले तर प्रथम दर्शन ओंगळ भिकाऱ्यांचे होते. जेवढे अधिक लाचार तेवढी अधिक कमाई, असे त्या भिकाऱ्यांचे गणित असते. एखादा कुत्रा मालकाच्या हातातील बटर, पावाचा तुकडा मिळवण्यासाठी शेपटी हालवतो, दोन पायावर उभा राहतो, उड्या मारतो. मला आज भिकारी आणि कुत्रा यांची आठवण येण्याचे कारण, "स्लमडॉग'ला मिळालेला एक आंतरराष्ट्रीय पुरस्कार आणि अनिल कपूरचे कौतुक. हा पुरस्कार कोणता, त्याचे नाव मला आठवत नाही आणि ते लक्षात ठेवायची गरजही वाटत नाही. अगदी ऑस्कर असले तरी गोऱ्या चमडीने छान म्हटल्यावर आपण खुष होऊन नाचायचे, हा प्रकार किती वर्षे चालणार. गोरी चमडी छान म्हणताना चांगल्याला चांगले म्हणत नाही. तसे असते तर इंग्रज अधिकाऱ्यांची जुलूम आणि भारतीय तरुणांची दुर्दम्य इच्छाशक्ती यावर आधारित "लगान' ला ऑस्कर मिळाले असते. ते मिळाले नाही. भारतीयांची मान उंचावणारा चित्रपट त्यांना चालतच नाही, पण स्लमडॉग म्हणजे झोपडपट्टीतील "कुत्रा' असे स्वत:चे नामाभिधान करून काढलेला चित्रपट मात्र लगेच पुरस्कार प्राप्त होतो. अशा नावाचा चित्रपट काढतानाही लाज वाटायला हवी होती. हा चित्रपट केवळ नावापुरताच आक्षेपार्ह असे नाही, त्याची कथा त्याहून आक्षेपार्ह आहे. एका मुस्लिम बाईच्या डोक्यात हिंदू लोखंडी गज मारतो. ती रक्तबंबाळ होऊन पडते. जातीय दंगल, त्यात फक्त मुस्लिमांचे हत्याकांड, त्यांच्या मालमत्तेची हानी, ही दृश्ये शंभर टक्के खरी आहेत का? हे कोणीही सांगावे. दंगल कोण सुरू करते आणि प्रथम वरचष्मा कोणाचा असतो, हे धार्मिक दंगल झालेल्या भारतातील कोणत्याही गावातील लोक सांगतील. मात्र, भारताची बदनामी केल्याशिवाय आंतरराष्ट्रीय स्तरावर बहुमान मिळत नाही.मला आश्चर्य वाटते ते सेन्सॉर बोर्डाचे. भारत म्हणजे झोपडपट्ट्या, उघड्यावर शौचाला बसणारे लोक, वेश्या व्यवसाय, जातीय दंगलीत मुस्लिमांची ससेहोलपट असे भारताचे विकृत चित्र दाखवणाऱ्या चित्रपटाला सेन्सॉरने परवानगीच कशी दिली. याउलट कथानक केले, हिंदूंची ससेहोलपट दाखवली, तर सेन्सॉर बोर्ड प्रमाणपत्र देणार आहे का? निश्चितच नाही. हिंदूंवरील अत्याचार "लज्जा' मध्ये शब्दबद्ध करणाऱ्या तस्लिमा नसरीनला भारतात राहू दिले जात नाही, मग तसा चित्रपट कसा मान्य होईल. एकीकडे 2020 पर्यंत भारत एक महासत्ता बनवण्याची स्वप्ने बघायची आणि त्याआधी 11 वर्षे भारताचे विकृत चित्र दाखवणारा चित्रपट बनवायचा आणि त्याचा गौरव हे विसंगत आहे.कोणाला पटो ना पटो माझे प्रामाणिक मत सांगतो, पूर्वी सत्यजीत रे असेच चित्रपट काढायचे. भारताचे दारिद्रय परदेशात विकून सत्यजीत रे विदेशात बहुमान मिळवतात, असा ते हयात असताना आरोप होत होता. त्यात तथ्यही आहे. सत्यजीत रे यांचा महान दिग्दर्शक म्हणून काहीजण गौरव करतात. मी असहमत आहे. त्यांनी फक्त भिकारडेच चित्रपट काढले. ते येथे मॅटिनीला लावायचे धाडसही वितरकांना होत नव्हते. "सत्यजीत रे रिट्रॉस्पेक्टिव्ह' म्हणून 7 दिवसांत 7 चित्रपट दाखवले जात, मात्र रे यांचा प्रत्येक चित्रपट कोणता तरी आंतरराष्ट्रीय बहुमान मिळवत असे. भारत म्हणजे अडाणी, निर्बुद्ध, दरिद्री लोकांचा देश ही भारताची पश्चिमेकडील प्रतिमा सत्यजीत रे यांनी पक्की केली. सत्यजीत रे यांना ती चाकोरी सोडून वेगळे काही करताच आले नाही. पुरावा हवा? कमर्शिअल सिनेमा तुम्हाला काढताच येत नाही, असा आरोप झाल्यावर त्यांनी "शतरंज के खिलाडी' हा कमर्शिअल सिनेमा काढला. तद्दन बंडल सिनेमांच्या यादीत आणखी एकाची भर पडली एवढेच. रे यांच्या आधी प्रभातने "सावकारी पाश'मधून सावकाराकडून पिळवणूक हा विषय मांडला. "माणूस'मध्ये वारांगनेचा विषय मांडला. भालजींनी "साधी माणसं'मध्ये मुंबईतील अनिष्ट प्रवृत्ती दाखवल्या. रे यांच्या समकालीन मेहबूब यांनी "मदर इंडिया'त दारिद्रय, फसवणूक, पिळवणूक, सावकारी, दरोडेखोरी असे सर्व विषय हाताळले. या सर्वांनी विषयाची मांडणी यथातथाच केली, मात्र रे यांनी भडकपणा बटबटीतपणा आणला.सत्यजीत रे यांच्याबरोबर त्यांचा वारसा संपला असे वाटत असतानाच हा स्लमडॉग आला. विपर्यस्त वातावरण दाखवताना एका गल्लीत श्रीरामचंद्रही दिसतात. त्यांच्या हातातील धनुष्यबाण बघून नायक जमाल पळत सुटतो. किती भंपक कल्पना! हिंदू देवदेवतांना इतक्या स्वस्त रूपात दाखवणे सेन्सॉरला कसे चालले. सेन्सॉर बोर्डाच्या अध्यक्षा शर्मिला टागोर आहेत. परवा संजय दत्तने आपल्या बहिणीला लग्नानंतर माहेरचे नाव न लावता सासरचे नाव लावण्याचा सल्ला दिला. हा सल्ला शर्मिला टागोरलाही लागू आहे. मन्सूरअली खानची बायको आणि सैफअली खानची आई ही शर्मिला टागोर असेलच कशी? तिने लग्नानंतरचे जे काही नाव असेल त्या नावाने चित्रपट परीक्षण करावे. स्लमडॉग सारखा हिंदूंवर अन्याय करणारा आणि भारताची बदनामी करणारा चित्रपट सेन्सॉर संमत झाल्याचे मग आश्चर्य वाटणार नाही.या चित्रपटाचे प्रदर्शन रोखावे म्हणून काही हिंदू धर्माभिमान्यांनी सेन्सॉर बोर्डाच्या मुंबईतील विभागीय अधिकाऱ्यांची भेट घेतली. एकदा प्रमाणपत्र दिल्यानंतर आम्ही ते प्रदर्शन रोखू शकत नाही, असे संबंधित अधिकाऱ्याने सांगितले. ते खरे असेलही. सेन्सॉर बोर्डाच्या प्रमाणपत्रानंतर चित्रपट प्रदर्शन रोखता येत नाही असे मात्र नाही. मुंबईतील मराठी-अमराठी वादावर काढलेल्या "देशद्रोही' या चित्रपटाचे प्रदर्शन कायदा, सुव्यवस्था यासाठी रोखण्यात आले. त्याला जेमतेम दोन महिने होत आहेत. यापूर्वी 1975 ला सुचित्रा सेनचा "आँधी' हा चित्रपट इंदिरा गांधींची बदनामी करणारा आहे, असा साक्षात्कार तो रिलीज होऊन बॉक्स ऑफिसवर पडल्यानंतर सरकारला झाला आणि त्यावर बंदी घालण्यात आली. थोडक्यात सेन्सॉर संमत झाला म्हणून सर्व संपले नाही. भारताची विकृत प्रतिमा हा चित्रपट निर्माण करत असल्याने आणि धार्मिक विद्वेष पसरवत असल्याने महाराष्ट्र सरकारने या स्लमडॉगला विष घालून मारावे.

No comments:

Post a Comment