Monday, June 7, 2010

शाब्बास इस्त्रायल

2007 साली गिलाड शालीत नावाचा एक इस्त्रायली सैनिक हमासने पकडताच इस्त्रायलने तेव्हापासून गाझा पट्टीची नाकेबंदी केली आहे. गेली 3 वर्षे 15 लाख लोकांचे हाल होत आहेत, हे खरे, पण हमासची नांगी ठेचून देशाचा धोका टाळण्यासाठी इस्त्रायल जगाची फिकीर करीत नाही. पॅलेस्टिनींना मदत घेऊन जाणाऱ्या बोटीवर हल्ला करून 20 जणांना ठार करायलाही इस्त्रायल कचरला नाही.
इस्त्रायल या छोट्या पण ताकदीने मोठ्या देशाबद्दल मला पहिल्यापासून प्रेम वाटते. मात्र आपला देश इस्त्रायलशी मैत्री ठेवत नाहीच. उलट सतत वैरभावाने वागतो. याचे मला पूर्वी वैषम्य वाटायचे, इस्त्रायल भारताला सतत मैत्रीचा हात देऊ करायचा आणि भारतानेही तो झिडकारायचा, असे नेहमी घडे. या दुराव्याने इस्त्रायलचे काहीच अडले नाही. उलट आपल्या अंतर्गत सुरक्षेची पुरती वाट लागली. "गाढवाला गुळाची चव काय?' म्हणतात, त्यामुळे आता पूर्वीएवढे वैषम्य वाटत नाही.
इस्त्रायलचे नव्याने कौतुक करण्याचेही कारण आहे. ज्या गोष्टीसाठी मी इस्त्रायलचे कौतुक करतो, त्या गोष्टीसाठी भारत सरकारने कडक शब्दांत निषेध केला आहे. राष्ट्रसंघाचे सरचिटणीस बान कीन मून यांनी निषेध केला. राष्ट्रसंघाच्या सुरक्षा समितीची तातडीने बैठक होऊन चौकशीचा ठराव झाला. एवढे सर्व होऊन इस्त्रायलची प्रतिक्रिया एकच पुन्हा आमची खोडी काढायचा प्रयत्न झाला, तर पुन्हा असेच करू. या उत्तरात कोणाला उद्धटपणा वाटला तरी 14 अरब राष्ट्रांनी वेढलेल्या इस्त्रायलचे अस्तित्व टिकून आहे ते यामुळेच. आपल्या संरक्षणासाठी जे करायचे, ते बिनधास्त करायचे. कोणाची पत्रास बाळगायची नाही, हे इस्त्रायलचे धोरण आहे. इस्त्रायलने जून 2007 पासून शेजारच्या गाझा पट्टीची नाकेबंदी केली आहे. गाझा पट्टीत 15 लाख वस्ती असून, या नाकेबंदीमुळे त्यांचे अतोनात हाल होत आहेत. 31 मे रोजी तुर्कस्तानची मावी मर्मरा ही बोट नागरिकांसाठी मदत घेऊन गाझाकडे निघाली. गाझापासून 65 कि.मी. अंतरावर आंतरराष्ट्रीय समुद्रात इस्त्रायलने या बोटीवर हल्ला केला. या हल्ल्यात बोटीवरील 20 जण मरण पावले. बोट ताब्यात घेऊन नाकेबंदीला तडा जाणार नाही, याची काळजी इस्त्रायलने घेतली.
15 लाख लोकांची नाकेबंदी करणे व त्यांना मदतही मिळू न देणे योग्य आहे का? असा प्रश्न कोणी विचारेल, पण त्याचे उत्तर इस्त्रायलने नव्हे; तर अरबांची सातत्याने बाजू घेणाऱ्या भारतासह इतर देशांनी द्यायचे आहे. 1967 साली क्रश इस्त्रायल म्हणत, 14 अरब राष्ट्रांनी इस्त्रायंल वर हल्ला केला तेंव्हा या चिमुकल्या नवजात राष्ट्राची किती देशांना कणव आली? या युध्दात इस्त्रायल चिरडला गेला नाहीच. उलट सायनायचे आखात, जॉर्डन नदीचा पश्चिम किनारा गाझा पट्टी असा प्रचंड भूभाग जिंकला. त्यानंतर यास्सार आरफतच्या पॅलोस्टिनी संघटनेने विमान अपहरण सुरू केले. ही मुक्ती संघटना दहशतवादी संघटना झाली. अराफत थकला. मृत्युपूर्वी त्याने इस्त्रायलशी समझोता केला. त्यानुसार 2005 साली इस्त्रायलने गाझा पट्टीवरील ताबा सोडला. अराफत यांच्या मृत्यूनंतर मेहमूद अब्बास पॅलेस्टिनी अध्यक्ष झाले. इस्त्रायल चिरडा अशीच भूमिका असलेल्या हमास या संघटनेचा उदय झाला.
ही हमास संघटना इस्त्रायलवर क्षेपणास्त्रे सोडत होती. कधी बसवर, कधी हॉटेलात क्षेपणास्त्र कोसळत होते.2007 साली गिलाड झालीत हा इस्त्रायली सैनिक हमासने पकडला. आपल्या एका सैनिकासाठी इस्त्रायलने 15 लाख लोकांची नाकेबंदे केली आहे. याला कोणी बरोबर म्हणो वा चूक आपल्या देशाचा एकेक सैनिक इस्त्रायल किती महत्त्वाचा मानतो ते यावरून दिसते.
1971 च्या युध्दात पाक हद्दीत विमान कोसळल्याने युध्दकैदी झालेले स्क्वाडूम लीडर अशोक तांबे यांच्या सुटकेसाठी आपण काहीही प्रयत्न केले नाहीत. पाकचे 90 हजार सैनिक इंदिरा गांधींनी सोडले, पण तांबे यांना ताब्यात देण्याची मागणी केली नाही. गेल्या 25 वर्षांत तर किती तरी भारतीय सैनिक काश्मीरमध्ये पाक घुसखोरांकडून मारले गेले आहेत. तोफांची सलामी, सरकारी इतमामात अंत्यविधी, विधवेला पेन्शन आणि जमल्यास त्या विधवेला राष्ट्रपती भवनात मरणोत्तर वीरचक्र, अशोक चक्र असे एखादे पदक द्यायचे, याची आपल्याला सवय झाली आहे. त्या पार्श्र्वभूमीवर एक सैनिक पकडला जाताच इस्त्रायल किती चवताळून उठतो आणि किती दीर्घ मुदतीची कारवाई करतो, हे पाहण्यासारखे आहे.
मला कौतुक वाटते ते इस्त्रायलच्या गुप्तचर यंत्रणेचे, गाझा पट्टीतील लोकांसाठी मदत घेऊन बोट निघाली. ही बातमी इस्त्रायलला लगेच मिळाली. बोटीवर एकही सैनिक नव्हता. स्वयंसेवक व पत्रकार होते. त्यांनी पांढरे निशाण फडकवले, तरीही बोटीवर हल्ला करून 20 जणांना मारले. इस्त्रायलच्या मर्जीविरुध्द पॅलेस्टिनींना मदत करण्याच्या फंदात कोणी पडू नये, असा सज्जड दम या कारवाईतून दिला आहे. नुसतीच बोट माघारी वळवली असती, तर प्रसिध्दीसाठी आणखी काही संस्था हाच प्रकार करीत राहिल्या असत्या. अशा बोटी अडवत रहाणे हेच इस्त्रायलच्या तटरक्षक दलाचे काम झाले असते, पण आता असा जबरदस्त तडाखा हाणल्यावर पुन्हा कोणी या फंदात पडणार नाही. आपले काम असे सोपे करायचे असते. अमेरिकाही तसेच करते. पाक-अफगाण सीमेवर तालिबानी अड्ड्याची माहिती कळताच त्या खेड्यावर बॉंबफेक होते.
तालीबानबरोबर नागरिकही मरतात तालिबान्यांना वेचून मारता येत नसेल तर तालिबांनी असतील तेथील सर्वांना अमेरिका मारते. पाकिस्तान गप्प आहे. आता आपली भूमिका पहा. व्याप्त काश्मीरमध्ये अतिरेक्यांची 40 प्रशिक्षण केंद्रे आहेत, असे आपले लष्कर प्रमुखच सांगतात. एवढी माहिती आहे तर तेथे जाऊन किंवा विमानातून बॉंब टाकून हे तळ उद्‌ध्वस्त का करीत नाही. प्रत्यक्षात अशी ठोस कारवाई करण्याऐवजी आपले सरकार पाकिस्तानबरोबर बंद केलेली चर्चा आपणहून सुरू करते. पाक एकीकडे आपल्याला चर्चेत गुंतवतो आणि दुसरीकडे सीमेलगत अतिरेक्यांना प्रशिक्षण देऊन घातपातासाठी भारतात पाठवतो. गंमत बघा, इस्त्रायलमध्येही निवडणुका होतात. सत्तांतर होते. मोशे दायन किंवा एहुल बराकसारखे नेते पराभूतही झाले आहेत. कोणताही पक्ष सत्तेवर आला तरी देशांच्या सुरक्षेच्या कक्षात कसलीही तडजोड करीत नाही.
आपलेही धोरण थोडसे वेगळे पण सातत्यपूर्ण आहे. शेजाऱ्यांनी लाथ घातल्या, अंगावर थुंकले तरी शत्रूच्या पायाशी बसून शांततामय सहजीवनाची पाठ म्हणत बसतो. सैनिक मरतात, नागरिक मरतात, मालमत्तेची हानी होते तरीही शांतीपाठ अखंड आहे. तुम्हीच विचार करा, देशरक्षणासाठी भारताची भूमिका योग्य आहे, की इस्त्रायलचे धोरण बरोबर आहे?

1 comment: